close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नाशिकमध्ये छगन भुजबळांकडून रंगला 'ठाकरे'चा खेळ

खेळ संपल्यावर छगन भुजबळांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं

Updated: Feb 12, 2019, 10:15 AM IST
नाशिकमध्ये छगन भुजबळांकडून रंगला 'ठाकरे'चा खेळ

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात छगन भुजबळांचं स्थान मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे नेहमीच लक्ष असतं. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेला अंगावर घ्यायचं मात्र त्यांनी टाळलं. त्यातच आता त्यांनी आणखी एक खेळ केलाय... खराखुरा चित्रपटाचा खेळ... 

नाशिकच्या एका चित्रपटगृहात 'ठाकरे'चा खेळ रंगला... पण याचं आयोजन शिवसेनेनं नव्हे, तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. यात जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ राजकीय नेते आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना या खेळासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. यात सर्व पक्षांचे नेते येतील, याची काळजीही भुजबळांनी घेतली... हा खेळ संपल्यावर त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. 

याद्वारे एका दगडात भुजबळांनी अनेक पक्षी मारलेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं तिकिट कुणाला मिळणार? याची चर्चा रंगलीय. पुतण्या समीर भुजबळ किंवा त्यांची पत्नी शेफाली यांना तिकिट मिळू शकतं. याखेरीज विधानसभेला नांदगावातून पुत्र पंकज आणि येवल्यातून स्वतः छगन भुजबळ उत्सुक आहेत. अशा वेळी शिवसेनेशी जवळीक असणं त्यांच्या फायद्याचं आहे. 

एकेकाळी शिवसैनिक असलेल्या भुजबळांनी बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा कधीच लपवून ठेवलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर चित्रपटाचा खास खेळ आयोजित करून त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलंय... यामुळे शिवसेनेची काठावरची मतं आपल्याकडे वळवण्यात त्यांना कितपत यश येतं, हे येणारा काळच ठरवेल...