दीपक भातुसे, झी मीडिया, मराठी : देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलं आहे.
मागील तीन वर्ष सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहेत.यंदा कोरोनाच्या संकटामुळे साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीतून कारखान्यांना बाहेर काढावं अशी मागणी शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
- साखरेची किमान विक्री किंमत सध्या 3100 रुपये आहे त्यात वाढ करून 3450 ते 3750 पर्यंत ग्रेड प्रमाणे वाढवून द्यावी
- मागील दोन वर्षात जेवढ्या ऊसाचं गाळप झालंय, त्या ऊसाला एक टन ऊसामागे 650 रुपये अनुदान
- केंद्र सरकारकडून दिलं जाणारं निर्यात प्रोत्साहन अनुदान मागील दोन वर्षांचं केंद्राकडे प्रलंबित आहे, ते तात्काळ देण्यात यावं
- साखरेचा साठा करण्यासाठी देण्यात येणारा दोन वर्षांचा खर्च केंद्राकडून मिळाला नाही, ते देण्यात यावे
- साखर कारखान्यांवरील कर्जाचे 10 वर्षांकरता पुनर्गठन करावं
- इथनॉलच्या उत्पादनासाठी डिस्टलरी सुरू करायला बँकांकडून कर्ज मिळावं
अशा मागण्या शरद पवारांनी या पत्रात केल्या आहेत. साखर उद्योगावर देशातील ५ कोटींपेक्षा जास्त शेतकरी अवलंबून आहेत. मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात झाालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील साखऱ उद्योग अडचणीत आला होता. यंदा देशभर कोरोनाचं संकट साखऱ उद्योगावर घोंघावत आहे.