Ajit Pawar Gets Angry: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले. हा त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.
राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी मतदारसंघातील एका कार्यक्रमात तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण असं विचारण्यात आलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस असं उत्तर दिलं. "देवेंद्र फडणवीस हेच मनातील मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट आहे. सध्या युतीचं सरकार असून एकनाथ शिंदे हे समजतूदार आहे. पण भाजपाच्या वतीने बोलायचं गेल्यास देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत," असं ते म्हणाले.
अजित पवार यांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते चांगलेच संतापले. "त्यांच्या मनात काय आहे याबद्दल मी काय सांगणार. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असून राष्ट्रवादीशी काही संबंध आहे का? त्यांनी काय चर्चा करावी हा त्यांचा अधिकार आहे. दुसऱ्यांच्या मतावर मी कशाला टीका टिप्पणी करायची," असं सांगंत अजित पवार यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
तसंच संजय राऊत यांनी 10 ते 15 दिवसांत सरकार कोसळणार असल्याचा इशारा दिला असून त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. "माझी अलीकडे संजय राऊतांची भेट झालेली नाही. नागपुरात शेवटी भेटलो होतो. त्यांना कोणती माहिती मिळालेली आहे याची माहिती नाही. अनेकजण अशी विधानं करत असतात. पण मला माहिती नसल्याने मी त्याबद्दल काय बोलणार," असं ते म्हणाले.
"एकनाथ शिंदे समजूतदार, पण आमच्या मनात...", फडणवीसांचा उल्लेख करत राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान
"नागपुरातून येत असताना मी जळगावच्या सभेसाठी परवानगी मिळाली नसल्याचं सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी मी स्वत लक्ष घालेन असं म्हटलं होतं. कोणाचंही सरकार असलं तरी मैदान मागितलं तर तो त्यांचा अधिकार आहे. संविधानातील अधिकाराचा वापर करत सभा घेऊ शकतो. फक्त कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, भावना दुखावणार नाही अशी भाषणं करायची नसतात," असं अजित पवारांनी सांगितलं.
"गुलाबराव पाटील शिवसेनेच्याच कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनेच त्यांना आमदार केलं. बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलं. मतांतर झाल्याने ते आता शिंदे गटात गेले आहेत. बोलण्याचा ओघात लोकं काही बोलतात, पण ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हेडलाईनसाठी ते पुरवठा करत असतात. आपल्याकडे महागाई, बेरोजगारी, पिकांचं नुकसान, खरेदी केंद्र बंद झाल्याचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा करा," असा सल्लाच त्यांनी प्रसारममाध्यमांना दिला.
"महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात निष्काळजीपणा निश्चित झाला आहे. निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत. राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी 13 ते 14 कोटी खर्च केले अशी माहिती माझ्याकडे आहे. अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांची चौकशी केली तर ती निष्पक्षपणे होईल असं वाटत नाही. म्हणून न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.