अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या हल्यात सहभागी असलेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा 30 जुलै रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या. या घटनेसंदर्भात अमोल मिटकरींनी खेद व्यक्त केला असून राजकारणात अशा घटना नाही घडल्या पाहिजे असं म्हटलंय. अमोल मिटकरीने जय मालोकार यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करून मालोकार यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचंही म्हटलंय. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांच्या घराच्या सुरक्षातेतही वाढ करण्यात आलीय. तसेच या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जय मालोकार 26 वर्षांचा तरुण आहे. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता असून अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो हल्ला करण्यात आला त्यामध्ये जयचा समावेश होता. या घटनेनंतर जयला अस्वस्थ वाटू लागले. अचानक छाती दुखू लागलं. त्यामुळे त्याला अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जयला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
अमोल मिटकरी म्हणाले की, 26 वर्षांचा एक युवक , कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तो तरुणही पक्षाचं काम करत होता. पण एक अभ्यास करणारा तरुण अशा पद्धकतीने जातो याचं वाईट वाटतं. या सगळ्या प्रकरणात मला काही झालं असतं, तर माझं कुटूंब उघड्यावर पडलं असतं. तेव्हा यांनी काय केलं असतं? मिटकरींना या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. एका कष्ट करणाऱ्या घरातील मुलगा गेलाय. मी देखील त्या कुटुंबाची भेट घेईन, असा शब्द मिटकरींनी दिला. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून इथं यावं.
अमोल मिटकरी म्हणाले की,सर्वसामान्यांचा राजकारणात जर जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? या घटनेला कुठलंही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चिथावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई-वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलिकडे पाहतो. मालोकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. मात्र एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.