बीड : माजलगाव नगरपालिकेत ( Majalgaon mayoral election) भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीने (NCP) जोरदार दणका दिला आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपवर आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची नामुष्की आली. राष्ट्रवादीने भाजपला दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंकजा मुंडे यांना बीड (Beed) जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
भाजपच्या रेश्मा मेंडके यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारच संख्याबळ नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्वादीचे शेख मंजूर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिला. यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष तीन महिने गैरहजर राहिल्याने त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर या पदासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे केवळ राष्ट्वादीचे शेख मंजूर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात आनंदाचे वातावरण आहे. तर पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यात हा मोठा धक्का बसला आहे.
चार वर्षापूर्वी माजलगाव नगरपालिकेची निवडणुक झाली होती. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक ही जनतेमधून होऊन भाजप आघाडीचे सहाल चाऊस हे विजयी झाले होते. पालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान ते सतत तीन महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याची तक्रार उपनगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षपद रिक्त केले. त्यानंतर मागील तीन महिन्यापासून या रिक्त पदाचा पदभार हा सुमनबाई मुंडे यांच्याकडे होता.