निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला

Updated: Jun 10, 2020, 05:46 PM IST
निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दीपक भातुसे, झी मीडिया रत्नागिरी : जवळपास आठवडाभरापूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या आणि अलिबाग, रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात नुकसान घडवून आणलेल्या cyclone nisarga निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर आता या वागळग्रस्त भागांमध्ये राजकीय नेतेमंडळींचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या भागाला भेट दिल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनीही कोकण किनारपट्टीवरील या वादळग्रस्त भागात पाहणी दौरा केला. 

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुळात नुकसानाचं चित्र किती विदारक आहे, याची स्पष्टोक्ती दिली.

याचवेळी पवारांनी आपण मुख्यमंत्री आणि राज्य शासनाशी याबाबत संवाद साधल्याची माहिती दिली. शिवाय, याच मुद्द्यावरुन आता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलवल्याचीही माहिती त्यांनी दिली. 
गुरुवारी दोन्ही जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे अर्थातच साऱ्यांचं लक्ष असेल.

'निसर्ग'च्या प्रकोपात घरांची पडझड झालेल्यांना मिळणार इतकी आर्थिक मदत

निसर्ग चक्रीवादळामुळं ओढावलेल्या या परिस्थितीतून आपण बाहेर पडू यात सहाजिकच सरकारचीही मदत असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय मुख्यमंत्रीही परिस्थितीची वारंवार माहिती घेत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. 

पवारांनी या पत्रकार परिषदेत मांडलेला आणखी एक मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्य सरकाबाबतचा. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाल्यानंतर आवश्यकता असल्यास मदतीसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारला जावं लागेल असंही ते म्हणाले. 

 

सध्याचा प्रसंग पाहता वादळग्रस्तांना कशा प्रकारे चांगली घरं देता येतील याबाबतचा महत्त्वाचा निर्णयही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावा लागेल हा मुद्दा पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच पवारांनी उचलून धरला होता. तेव्हा आता केंद्राकडून कोकणासाठी सढळ हस्ते मदत होणार का, राज्याकडून केंद्राकडे नेमक्या कोणत्या मागण्या केल्या जाणार आणि मुख्य म्हणजे पवार- ठाकरे बैठकीत नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.