जयंत पाटील यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले "हिंमत असेल तर ठाण्यात..."

Jayant Patil Challenge to Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Pati) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर ठाण्यातील पोलिसांची बाहेर बदली करुन दाखवा असं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2023, 04:19 PM IST
जयंत पाटील यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले "हिंमत असेल तर ठाण्यात..." title=

Jayant Patil Challenge to Devendra Fadnavis: ठाण्यात युवासेनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांनी मारहाण झाल्यानतंर विरोधक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह रोशनी शिंदे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. 

"एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. भिती दाखवणे बळजबरी करणं अशा घटना घडत आहेत. विरोधात कोणी बोललं तर मारहाणीसारख्या घटना घडतात. हे गंभीर प्रकरण असून आरोपींना अटक करणं गरजेचं आहे," असं जयंत पाटील म्हणाले आहेत. 

"ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्याशिवाय काहीच होत नाही. फडणवीसांचं ठाण्यात काहीच चालत नाही. माझे फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की, ठाण्यातील पोलिसांची बाहेर बदली करून दाखवा," असं जयंत पाटील म्हणाले आहेत. 

"वैभव कदमने आत्महत्या केली. पण याच्या खोलात जाण्याची गरज आहे. आव्हाडांविरोधात कबुलीजबाब देण्यासाठी त्याच्यावर दबाव होता. पोलीस आयुक्त काही काम करत आहेत का?या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी," अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. 

"ठाण्यात कोणीही येतं आणि करतं. ठाणे स्वंतत्र भाग मानत, वेगळे कायदे करा. ठाण्यात अनाधिकृत हॉटेल पहाटेपर्यत सुरू ठेवले जात असून कारवाई करत नाही. ठाणे वेगळा प्रांत मानला जात आहे," अशी टीका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली

रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण झाल्याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि फडणवीसांमध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडतूस गृहमंत्री असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अडीच वर्षांचा कारभार पाहिल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं फडणवीस म्हणाले आहेत.

"फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तरीही ते हलायला तयार नाहीत. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

"मी पुन्हा सांगतोय की, शिवसैनिक शांत आहेत म्हणजे तुमच्यासारखे नपुंसक नाहीत. मनात आणलं तर ठाण्यातून मुळासकट उखडून टाकतील असे शिवसैनिक आणि नागरिक आहेत. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा लोक तुमच्यावर थुंकतील. थोडी लाज, लज्जा शरम असेल तर बिनकामाच्या आय़ुक्तांची बदली करा किंवा निलंबित करा. ठाण्याला कणखर आयुक्त द्या. अद्याप साधा एफआयरही दाखल झालेला नाही. ज्यांच्या नावाने यात्रा काढत आहात साधे त्यांचे घेणार असाल तर यात्रा काढू नका," असंही ते म्हणाले.