लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील (NCP) फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीने 48 पैकी एकूण 31 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने 14, उद्धव ठाकरेंनी 9 आणि शरद पवारांनी 8 जागा जिंकल्या. या निकालामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण यादरम्यान शरद पवारांनी एक मोठं विधान केलं आहे.
आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी रहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो असं शरद पवार म्हणाले आहेत. मोदीबागेत भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांनी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे विधान करत एकाप्रकारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेतच दिले आहेत. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला संकेत दिले आहेत.
शरद पवारांनी यावेळी सांगितलं की, "आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी रहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून आपल्याला यश मिळालं. उद्यापासून विधानसभेच्या कामाला लागा. राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा".
लोकांची जास्तीत जास्त काम करा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. लोकांचा फारसा संबंध दिल्लीत येत नाही राज्यात प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा असं शरद पवार यावेळी म्हणाले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पुण्यातील पहिल्या बैठकीत सहभागी झालेले पुणे शहर प्रमुख प्रशांत जगताप म्हणाले आहेत की, "शरद पवारांनी बैठकीत आम्हाला शिवसेना आणि काँग्रेससोबतची युती कायम राहावी यासाठी लोकसभेत कमी जागांवर निवडणूक लढलो. त्यांनी विधानसभेत चित्र वेगळं असेल याचे संकेत दिले आहेत". दरम्यान जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी किती जागांची मागणी करायची यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीमधील काही आमदार घाबरले असून त्यांच्यातील काहींनी जयंत पाटील आणि आमच्या नेत्यांसी संपर्क साधला असल्याचा दावा यावेळी अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यांच्यासोबत काय करायचं याचा नंतर निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत.