सोलापूर : राणाजगजितसिंह पाटील यांच्या बहुप्रतीक्षित प्रवेश नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राणा जगजितसिंह यांनी उस्मानाबादमध्ये जाहीर सभा घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे आणि त्यामुळे एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या गोटातून भाजपच्या गळाला लागला हे स्पष्ट झाले आहे.
कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार आणि माजी गृहमंत्री व शरद पवार यांचे जुने सहकारी पदमसिंह पाटील यांचे सुपूत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. आमदार पाटील मुंबईत राजीनामा देणार आहेत. आपले जीवितकार्य ठरले आहे. या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. मतदारसंघ कोणता लढणार त्याबाबत नंतर माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. शरद पवार कायमच आदर्श राहिले आहेत अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेना नेते आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. गाढवाने जरी वाघाचं घोंगडं घालून वाघाच्या कळपात शिरण्याचा प्रयत्न केला तरी ही जनता तुमच्यावर गाढव असल्याचं शिक्कामोर्तब विधानसभा निवडणुकीत केल्याशिवाय राहणार नाही, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.