अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : सध्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयविकाराच्या त्रासाने ग्रासलं आहे. अनेक जण योग्यवेळी उपचार करुन त्यातून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही जण योग्यवेळी उपचारांअभावी आपले प्राण गमावतात. मात्र आता हृदयरोगाच्या जलद निदानासाठी सोलापुरातील डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे.
वेळेत निदान न झाल्याने हृदयरोगाच्या रुग्णांना नेहमी प्राणास मुकावे लागते किंवा त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. मात्र आता लवकर निदान होण्यासाठी एक नवीन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हृदयविकाराचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे.
हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हे देखील प्रमुख कारण आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे इसीजी. मात्र गाव-खेड्यात ईसजी मशीन देखील उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉ. गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे.
हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर इसीजी रुग्णच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे. सध्या बाजारात अनेक उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. हृदयविकाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 LEAD ECG फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे.
अद्याप ही हे उपक्रम निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर हे उपकरण बाजारात येईल. यासाठी जवळपास 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो अशी माहिती देखील डॉ. गुरुनाथ परळे यांनी दिली. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हे जॅकेट दिलासादायक ठरणार आहे.
दरम्यान, डॉ. परळेनी तयार केलेलं हे जॅकेट नक्कीच येणाऱ्या काळात ह्रदय रोगाच्या रुग्णांना दिलासादायक ठरणार आहे. मात्र आता हे जॅकेट सर्वसामान्यांसाठी मार्केटमध्ये कधी उपलब्ध होणार आणि सर्वसामान्य, गरीब , गरजू जनतेसाठी याचा नेमका कसा फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.