अभियंत्यावरील चिखलफेकीप्रकरणी नितेश राणेंना अटक

नितेश राणे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.

Updated: Jul 4, 2019, 07:04 PM IST
अभियंत्यावरील चिखलफेकीप्रकरणी नितेश राणेंना अटक title=

कणकवली: महामार्ग उपउभियंत्यावर केलेल्या चिखलफेकप्रकरणी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांकडून नितेश राणे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात नितेश यांच्यासह स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नितेश राणे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. 

नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते. 

या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. यानंतर संध्याकाळच्या सुमारास पोलीस नितेश राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नितेश राणे स्वत:हून पोलीस ठाण्यात गेले. याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. सध्या कणकवली पोलीस ठाण्याबाहेर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. 

आता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार; बघतोच सरकार काय करते?- नितेश राणे

तत्पूर्वी नारायण राणे यांनी नितेश यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. 

नारायण राणे म्हणतात, नितेश चुकीचं वागला