पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी

 पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली.  

Updated: Mar 13, 2019, 07:12 PM IST
पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना -  नितीन गडकरी title=

नागपूर : पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचे नाव पुन्हा समोर आले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे जरी सरकार आले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, असे व्यक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर गडकरींच्या नावाची चर्चा जोर धरु लागली. मात्र, गडकरींनी स्वतः ही शक्यता मात्र फेटाळली आहे.

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असे शरद पवार म्हणालेत. लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित एनडीएला बहुमत मिळेल पण मोदींना पर्याय शोधावा लागेल असे शरद पवार यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे जुन्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली. ती चर्चा म्हणजे गडकरींच्या पंतप्रधानपदाची. मोदी नसतील तर कोण, असे विचारल्यावर गडकरींचं नाव पुढे येत आहे. स्वतः गडकरींनी मात्र पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

पंतप्रधानपद ही माझी महत्त्वाकांक्षा नाही. संघाची तशी योजनाही नाही. 'अथक काम करणं' हा माझा मंत्र आहे. राजकारणात किंवा कोणतंही काम करताना आपण कोणता हिशेब ठेवलेला नाही. जिथं रस्ता मिळेल, जे काम दिसेल ते करत गेलो. देशासाठी सर्वोत्तम काम करण्यावर माझा विश्वास आहे. मी कुणाच्या जास्त जवळ जात नाही. लॉबिंग करत नाही. मनापासून सांगतो की मी या शर्यतीत नाही. मी मोदीजींच्या मागे खंबीरपणे उभा आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. 

मराठी माणूस पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. पवार ज्योतिषी कधी झाले, असा त्यांचा सवाल आहे. आता घोडामैदान जवळ आहे. पुढल्या सव्वादोन महिन्यांत चित्र स्पष्ट होणार आहे. झी २४ ताससह अनेक मतदानपूर्व चाचण्यांमध्ये बहुमताचा जादुई आकडा गाठताना एनडीएची दमछाक होण्याचा अंदाज आहे. अशा वेळी भाजपाला नवं नाव शोधावं लागलंच तर मात्र मराठी पंतप्रधानाचं स्वप्न पूर्ण होणं शक्य आहे.