दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी

राज्यात गणेशोत्सवातचा उत्साह शिगेला 

Updated: Sep 4, 2019, 07:33 AM IST
दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी  title=
दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप

मुंबई : मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी ऐन उत्साहाच्या दिवसांमध्ये मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या दमदार सरी बरसत असताना छत्र्या घेऊन, ताडपत्री घेऊन, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत मुंबईकरांना विसर्जनस्थळापर्यंत पोहोचावं लागत होतं. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या', असा गजर करत भर पावसात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर, पुण्यातही वाजत गाजत गणपतीला निरोप देण्यात आला. मुख्य म्हणजे विसर्जनासाठी अनेक गणेश भक्तांनी कृत्रिम तलावांना पसंती दिली. 

इथे कोकणातही असंच चित्र पाहायला मिळालं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रायगडकरांनी त्याला भावपूर्ण निरोप दिला. पाऊस सुरू असला तरी भक्तांचा उत्साह मात्र तसूभरही कमी होत नव्हता. ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत बाप्पाला निरोप देण्यात आला. ग्रामीण भागात समूहाने विसर्जनासाठी निघालेल्या गणेशमूर्ती विशेष लक्ष वेधून घेत होत्या. परंपरेप्रमाणे सामूहिक आरती झाल्यानंतर नदी, तलाव तसेच समुद्रात गणरायाच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. 

एकिकडे दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात असतानाच, गणशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती सभामंडपासमोर सामूदायिक अथर्वशीर्ष पठण पार पडलं. 'ओम् नमस्ते गणपतये... गजानना, गजानना...ओम गं गणपतये नम:... मोरया, मोरया...'च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केलं. यंदाचं अथर्वशीर्ष पठणाचं हे ३३ वे वर्ष. 

गणरायाचरणी १५१ किलोंचा मोदक 

गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासोबत बाप्पाचरणी वेगवेगळ्या पदार्थांपासून साकारण्यात आलेले चवदार पदार्थही नैवेद्य म्हणून दाखवण्याकडे भाविकांचा कल असतो. यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा चरणी भक्तगणांकडून तब्बल १५१ किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला. वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी हा मोदक बाप्पाच्या चरणी अर्पण केला. काका हलवाईचे महेंद्र गाडवे आणि युवराज गाडवे यांनी हा मोदक साकारला आहे. या मोदकाला काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्क लावले असून सलग ८ तासांच्या मेहनतीनंतर १५ कारागिरांच्या मदतीने हा मोदक करण्यात आला.