सरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता

Updated: Sep 30, 2019, 09:58 AM IST
सरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट title=
संग्रहित फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच कांदा भाव खातोय. कांदा प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या घरात आहे. तर किरकोळ बाजारात कांदा साठ रुपये किलोंवर गेला आहे. नवा कांदा बाजारात येण्यास उशीर होणार असल्याने कांद्याचे भाव आणखी वाढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाफेडने पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय देशी कांदा निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार नफा मिळतोय. त्यातच आता निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव कोसळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

कांदा निर्यातीवर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.  या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असला तरी कांदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

एकुणच कांदयाच्या वाढत्या दराला वेसण घालण्याचा हा प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्यातील तेवीस बाजार समितीत गेल्या चार दिवसात कांद्याचे भाव आठशे ते हजार रुपयानी घसरले आहेत.

कांद्याचे भाव वाढू लागल्याने सरकारने कांदानिर्यातबंदी जाहीर केली. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कांदा किरकोळ बाजारात साठीच्या घरात गेल्याने सामान्य ग्राहकही रडकुंडीला आला आहे.