मुंबई : राज्यात मुख्यमंत्र्यांनंतरचे दोन नंबरचे वजनदार नेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यावेळी विधानसभेच्या रिंगणात, पुण्यातल्या कोथरुडमधून विधानसभा लढणार आहेत. मेधा कुलकर्णी यांना मात्र या जागेसाठी त्याग करावा लागणार आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडचा सुरक्षित मतदार संघ निवडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षानेच पाटील यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केलाय. कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. इथे आमदार मेधा कुलकर्णी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.घटस्थापनेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युतीची घोषणा, भाजपाची पहिली यादी अशा घडामोडींना वेग आला आहे.
भाजपा आज त्यांची पहिली यादी जाहीर करणार आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल दिल्लीत पार पडली. त्यात युतीबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबाबतचा निर्णय मुंबईतच जाहिर करण्यात येणार आहे.
भाजपची सोमवारी मुंबईत आणखी एक मेगाभरती होणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडाळकर आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेसचे सहा नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले मालाडमधील आमदार अस्लम शेख यांचा समावेश आहे. याशिवाय, राहुल बोंद्रे (बुलढाणा), काशीराम पावरा (धुळे), डी.एस. अहिरे (धुळे), सिद्धराम म्हेत्रे (सोलापूर) आणि भारत भालके (पंढरपूर) हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील.