ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.

Updated: Jan 4, 2023, 11:29 AM IST
ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय title=
(फोटो सौजन्य - PTI)

Mumbai Pune Expressway : कर्मचाऱ्यांच्या संपापासून ते पगाराच्या थकबाकीपर्यंत महाराष्ट्र परिवहन महामंडळाची म्हणजे एसटी महामंडळाची कायमच चर्चा असते. त्यानंतर आता एसटी महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून (Mumbai Pune Expressway) आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस (ST Bus) धावणार नाहीत. त्यामुळे आता प्रवाशांना लालपरीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करता येणार नाही. आता फक्त मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून शिवनेरी बस (Shivneri Bus) धावणार आहे. एसटीच्या साध्या बसेस मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरून धावत असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला (MSRTC) बसत आहे.

एक्सप्रेसवेवर लालपरीला बंदी 

प्रवाशांची कमी संख्या आणि टोलचा अतिरिक्त भार यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत होता. यानंतर आता एसटी प्रशासनाने कठोर पावले उचलत एक्सप्रेसवेवर एसटीच्या साध्या बसला बंदी घातली आहे. मात्र जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून साध्या एसटी बसेस धावत नसल्याने 30 ते 50 टक्के प्रवासी घटले असल्याची माहिती समोर आली आहे.

जुन्या मुंबई - पुणे हायवेवर लालपरील परवानगी

एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक परिपत्रक काढले होते. परिपत्रकानुसार, एसटीच्या साध्या बस या जुन्या मुंबई - पुणे मार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाने शिवनेरीव्यतिरिक्त इतर एसटी बसने मेगा हायवेवरून प्रवास केल्यास त्यांच्या ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम त्या चालकाकडून वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले होते. यासोबतच एक्सप्रेसवेवरुन साध्या एसटी चालवण्या चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून धावत होत्या. मात्र, काही चालक परस्परपणे एक्स्प्रेसवर या एसटी बस चालवत असे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

टोलचा अतिरिक्त भुर्दंड

आधी जुन्या मुंबई - पुणे हायवेवरुन साध्या एसटी बस मेगा हायवे सुरु झाल्यानंतर एक्सप्रेसवेवर धावू लागल्या. शिवसेनरीसोबत साध्या बस धावू लागल्याने प्रवासी भारमान कमी झाले आणि याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होऊ लागला. तसेच जुन्या मुंबई-पुणे हायवेवर एका बसला 485 रुपये टोल द्यावा लागतो. दुसरीकडे एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल द्यावा लागतोय. त्यामुळे एका बसमागे एसटी प्रशासनाला 190 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागत आहे. परिपत्रक काढूनही बेशिस्त एसटी चालकांकडून साध्या एसटी बसेस या मुंबई - पुणे एक्सप्रेसवरुन चालवणे सुरुच ठेवले. त्यामुळे आता प्रशासनाने निर्णय घेत एक्सप्रेसवेवर या एसटी बसेस ना बंदी घातली आहे.