कामगार कोरोनाग्रस्त झाल्यास कारखान्याच्या मालकाविरुद्ध कारवाई नाही

कोरोनाचा संसर्ग होण्याचं  एकंदर प्रमाण पाहता.... 

Updated: Apr 22, 2020, 05:11 PM IST
कामगार कोरोनाग्रस्त झाल्यास कारखान्याच्या मालकाविरुद्ध कारवाई नाही title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या काही काळापासून सर्वत्र दहशत माजवणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर आता विविध क्षेत्रांवर याचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याचं  एकंदर प्रमाण पाहता, याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय आता समोर आला आहे. 

कारखान्यामधील किंवा आस्थामनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकातून स्पष्ट केलं आहे.

कोणत्याही कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल केली जाणार असल्याच्या बऱ्याच चर्चा आणि मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करण्यात आले होते. पण, अशी कोणत्याही प्रकारची बैठक महाराष्ट्रात झालेली नाही आणि त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीनही नाही, असं स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलं आहे.

फॉरवर्ड केलं जाणारं पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरवण्यात येत आहे. कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणुची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई येईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये सोबतच त्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.

 

कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात पत्रकात करण्यात आले आहे.