विठुरायाच्या भक्तांच्या मनाची श्रीमंती, विठ्ठलाच्या चरणी 1 कोटींचं दान

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता आलेलं नाही. मात्र दानाच्या बाबतीत मनाची श्रीमंती कुठंही कमी झालेली नाही

Updated: Aug 4, 2021, 06:08 PM IST
विठुरायाच्या भक्तांच्या मनाची श्रीमंती, विठ्ठलाच्या चरणी 1 कोटींचं दान  title=

पंढरपूर : पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरला येत असतात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून इथं भाविकांना येता आलेलं नाही. त्यामुळे मंदिरात येणारा देणगीचा ओघही कमी झालाय. पण अशातच मुंबईतल्या एका भाविकानं मनाची श्रीमंती दाखवलीय. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी चक्क एक कोटीचं दान दिलंय. मात्र आपलं नाव उघड करू नये अशी विनंती या भाविकानं केलीय. 

ही भाविक एक महिला असून तिनं आपल्या पतीच्या इच्छपूर्तीसाठी एक कोटींचं दान दिलं आहे. तिचे पती विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं. मात्र विठ्ठलाला दान देण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. त्यानंतर या महिलेनं त्यांच्या विम्याचे एक कोटी रूपये विठ्ठलाच्या चरणी देऊन पतीची अपूर्ण इच्छा पूर्ण केलीय. 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व देवस्थानं भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काही काळासाठी मंदिरं उघडण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने मंदिरं बंद करण्यात आली आहेत.

पंढरीचा विठ्ठल म्हणजे गोरगरीब, कष्टक-याचं श्रद्धास्थान. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता आलेलं नाही. मात्र दानाच्या बाबतीत मनाची श्रीमंती कुठंही कमी झालेली नाही. मुंबईतल्या भाविकाच्या कृतीतून हेच अधोरेखित झालंय.