Pankaja Munde : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना परभवाचा धक्का बसला. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देखील याचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंकजा मुंडे या पुन्हा भरारी घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. पक्षाकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यामुळे त्या नाराज आहेत. 'संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार का? अशी चर्चा त्यांच्या या वक्तव्यामुळे रंगली आहे.
'संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. मला संधी का देत नाही, याचं उत्तर संधी न देणा-यांना विचारा, अशी सूचक नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवली. नाशिकमधील स्टुडंट समिट कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
अंगात चांगली गुणवत्ता'' काम करण्याची क्षमता असतानाही जर संधी मिळत नसेल तर स्वाभिमानाने केलेली एक्झिट हे केव्हाही चांगली असते. मात्र आतापर्यंत लोकांनी दिलेले प्रेम आणि मी त्यांचा कमावलेला विश्वास हा कधीही कमी होणार नाही, असे मत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्टुडंट्स समिट या कार्यक्रमात मुलाखती दरम्यान व्यक्त केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पार पडलेल्या एक दिवसाच्या स्टुडंट्स समिट या वी प्रोफेशनल प्रायोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलखात घेण्यात आली. यावेळी त्यांनी बालपणातील शिक्षण, महाविद्यालय जीवन आणि राजकारणातील प्रवास उलगडला. वडील गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार नुसार माणसांनी इतिहास नुसता वाचून उपयोग नाही ते इतिहास घडविला पाहिजे. त्यांचा हा विचार मी अंमलात आणते आहे.
कोणत्याही क्षणाला झुकणार नाही, वाकणार नाही, हा वडिलांचा बाणा आजही माझ्या अंगात कायम आहे.
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी स्पष्ट असले तरी चालेल. मात्र, कोणत्याही क्षणाला झुकणार नाही, वाकणार नाही. हा वडिलांचा बाणा आजही माझ्या अंगात कायम आहे. या दृष्टीने महाभारतातील भीष्मपितामह यांची भूमिका मी आज सध्या वठवित आहे असं म्हटलं तर वावगे होणार नाही.
कुटुंबात, समाजात वावरताना तसेच राजकारणातही मी खूप संयम बाळगला आहे. या संयमातुन मला हवे ते मिळेल आणि माझी परिस्थिती बदलेल यावर मी विश्वास ठेवून आहे. राजकारणात मी खूप काही मिळवले आहे आणि मिळवायचे आहे आणि ते मी मिळवणार. यात शंका नाही असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
वडील गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर माझ्या वाट्याला अनेक अवहेलना, वेदना, दुःख, अपमान आले. या सर्व वेदना मी पचविल्या. गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार होणे इतके सोपे नाही हे आज मला उमगते आहे. असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.