सैतानी भोंदूबाबा, पाच बहिणींपैकी एकीवर बलात्कार तर दुसरीशी लग्न

पिंपरीत कुटुंबाला लुबाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.  

Updated: Feb 25, 2020, 06:34 PM IST
सैतानी भोंदूबाबा, पाच बहिणींपैकी एकीवर बलात्कार तर दुसरीशी लग्न
संग्रहित छाया

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरीत कुटुंबाला लुबाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. पाच बहिणींपैकी एका बहिणीवर बलात्कार, दुसरीशी लग्न आणि तीन बहिणींशी अश्लील चाळे करणाऱ्या सैतानी भोंदू बाबाचे कारनामे उघड झाले आहेत. एक कुटुंब, पाच बहिणी. एकीवर तीन वेळा बलात्कार, एकीचे लग्न झाले असतानाही तिच्याशी लग्न. इतर तीन बहिणींशी अत्यंत अश्लील चाळे. हे सगळं केले आहेत सोमनाथ चव्हाण या भोंदू बाबाने. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

सोमनाथ कैलास चव्हाण. वय ३२. राहणार खैरेवाडी, जिल्हा रायगड. त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. वरवरुन तो भोळा दिसत असला तरी तो भोंदूबाबा आहे. एक नंबरचा सैतानी. पिंपरीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला त्यानं गंडवलं. तुमच्याच एका नातेवाईक बाईनं करणी केल्यानं तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही, अशी भीती त्याने कुटुंबाला घातली.

एवढेच नाही तर घरात मोठं गुप्तधन असल्याचं त्यानं सांगितलं. त्यात ७ पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपती मूर्ती असल्याचंही सांगितलं. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन मिळवण्यासाठी आणि मुलीचे प्राण वाचवण्यासाठी ३ वेळा नग्न पूजा आणि उतारा करावा लागेल असं सांगितले. त्यासाठी ३ लाख ११ हजारांची मागणी केली. पूजा करताना त्याने कुटुंबातल्या चार मुलींना बंद खोलीत नेले. एकीवर तीन वेळा बलात्कार केला तर इतर तीन बहिणींशी अश्लील चाळे केले. एका विवाहितेशी विवाहसुद्धा केला. अखेर या कारनाम्यांनंतर सोमनाथ चव्हाणला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली.

आम्ही या भोंदूबाबाला अटक केली आहे. या भोंदूबाबानं आणखी कुणाला फसवलं असेल तर पुढे यावं असं आवाहन  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख यांनी केले आहे. सोमनाथ चव्हाण याच्यावर बलात्कार, नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.