...आणि 'विलास' जागा झाला!

 इतके दिवस गायब झाल्यानंतर आता अचानक हा 'विलास' का जागा झाला हे जनतेला कळणार नाही हे कसे शक्य आहे. ये पब्लिक है सब जानती हैं...!

Updated: Jun 11, 2021, 10:05 AM IST
...आणि 'विलास' जागा झाला! title=

कैलास पुरी, ब्लॉग झी मिडिया पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड परगण्यातील भोसरी प्रांतात 2014 च्या विधानसभा रणसंग्रामात चारी मुंड्या चित झाल्यानंतर अज्ञातवासात गेलेल्या घड्याळ प्रांताच्या 'विलास' ने स्वतः साठी ना घड्याळ प्रांतासाठी काही केले. महापालिकेच्या रणसंग्रामातही पुत्र विजया शिवाय काही प्रयत्न त्याच्या कडून झाला नाही.  पण अचानक 2019 ला चमत्कार घडेल या आशेने 'विलास' मैदानात उतरला. पण पराभवानंतर अज्ञात वासात जाऊन केवळ निवडणुकी पुरते मैदानात उतरलेल्या 'विलास' ला भोसरीकरांनी चांगलेच पाणी पाजले.

राजकीय रणसंग्राम लढायचा म्हणजे अमावस्येच्या चंद्राप्रमाणे नाही तर सातत्याने लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांची कामे करणे गरजेचे असते. पण किती तरी वर्ष राजकारणात असून ही बाब 'विलास' च्या लक्षात येत नाही याचे मात्र त्यांच्या पाठीराख्याना चांगलेच दु:ख होत आहे. पण पाठीराख्यांची आणि प्रांतातील जनतेची काळजी असेल तो राजकारणी कसला. 

पराभवानंतर खरे तर खचून न जाता उभारी घेत काम करणे गरजेचे. त्याची फिकीर न करता काही कुरघोड्या करून विजयश्री खेचता येईल ही अपेक्षाच चुकीची...! हे राजकारणातील साधे गणित कोणी समजत नसेल त्याला 'विलासी' म्हणणार नाही तर काय. पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम आता जवळ आला. या रणसंग्रामात आपण काही तरी चमत्कार करू अशी स्वप्ने आता 'विलास' ला पडू लागली आहेत. त्या साठी त्याची तयारी ही सुरू झाली आहे.

 पिंपरी चिंचवड राजकारणाची नस ना नस ओळखत असलेल्या सल्लागार मंडळाला विलासने पाचारण केलं आहे. हे सल्लागार मंडळ आता भोसरीतल्या कधी काळी सर्व शक्तिमान असलेल्या या नेत्याला पुन्हा यशस्वी करणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज काल शहरात कोणतीही घटना घडली की आता भोसरी मधून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

अगदी गल्ली बोळातल्या प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर सध्या 'विलास' कडून प्रतिक्रिया आहेत. आता प्रांतातील सत्ताधारी कमळ प्रांताच्या कारभारावर ही जोरदार प्रहार त्याच्या कडून होत आहेत. आपल्या बदलेल्या या रुपामुळे चमत्कार घडेल. गेलेले वैभव प्राप्त होईल. भोसरी प्रांत आपण पुन्हा काबीज करू अशी अपेक्षा आता ते बाळगून आहेत. त्या साठी प्रत्येक गोष्टींवर सध्या ते बारीक लक्ष ठेवून आहेत, आणि त्यांचे सल्लागार मंडळ तत्परतेने त्यांना सल्ला देत आहे. 

साहजिकच आहे आठ नऊ महिन्यावर आलेल्या महापालिका रणसंग्रामात काही तरी करण्याची आशा त्याला आहे. पण इतके दिवस गायब झाल्यानंतर आता अचानक हा 'विलास' का जागा झाला हे जनतेला कळणार नाही हे कसे शक्य आहे. ये पब्लिक है सब जानती हैं...!