'झाडे लावा, क्वार्टर मिळवा'; अधिकाऱ्याच्या प्रतापामुळे महापालिकेची नाचक्की

पोस्टमुळे सोशल मीडियावर महापालिकेची बदनामी

Updated: Jul 12, 2019, 05:16 PM IST
'झाडे लावा, क्वार्टर मिळवा'; अधिकाऱ्याच्या प्रतापामुळे महापालिकेची नाचक्की title=

अहमदनगर: शासनाच्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहीमेची खिल्ली उडवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एक संदेश सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, अशा आशयाचा संदेश या अधिकाऱ्याने पोस्ट केला होता. मात्र, हा खोडसाळपणा संबंधित अधिकाऱ्याच्या अंगलट आला असून त्याचे निलंबन करण्यात आले आहे. किशोर देशमुख असे त्यांचे नाव असून ते अहमदनगर महापालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कामाला आहेत. 

सध्या अहमदनगरमध्ये महापालिका प्रशासनाकडून वृक्ष लागवड चळवळीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी किशोर देशमुख यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एक संदेश पोस्ट केला होता. ‘सर्व मुकादमांना सुवर्णसंधी.. पावसाळ्यात झाड लावा व वाढवा आणि हिवाळ्यात क्वार्टर फ्री मिळवा.. झाडे लावा क्वार्टर मिळवा, संधीचा लाभ घ्यावा’, असा मजकूर या संदेशात लिहला होता. या पोस्टमुळे सोशल मीडियावर महापालिकेची बदनामी सुरू झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी किशोर देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश दिले. 

मात्र, किशोर देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या संदेशातील क्वार्टर’चा चुकीचा अर्थ लावण्यात आला. संस्थेची बदनामी नको, म्हणून माफीही मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.