"निर्भया फंडांतून घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी"; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Nirbhaya Fund : या वाहनांचा वापर शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

Updated: Dec 11, 2022, 05:05 PM IST
"निर्भया फंडांतून घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी"; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप title=
(फोटो सौजन्य - PTI)

Nirbhaya Fund : महिलांविरोधात होणारे गुन्हे रोखण्यासाठी सरकारने निर्भया पथकाची (nirbhaya pathak) स्थापना केली होती. यासाठी सरकारने निर्भया फंडाची निर्मिती देखील केली होती. पण आता मुंबईत महिलांच्या सुरक्षेऐवजी खासदार आणि आमदारांच्या संरक्षणासाठी हा निधी वापरला जात आहे. मुंबई पोलिसांनी महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी निर्भया फंडांतर्गत अनेक वाहने खरेदी केली. मात्र जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील शिवसेनेच्या आमदार-खासदारांना घेऊन जाण्यासाठी या वाहनांचा वापर केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

शिंदे गटातील आमदारांना नक्की भीती कशाची वाटतेय?

जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख केला आहे. "निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. एकीकडे मा. मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्या सोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

"निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते," असेही जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय? 

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जूनमध्ये मुंबई पोलिसांनी निर्भया फंडांतर्गत अनेक वाहने खरेदी केली. 220 बोलेरो, 35 अर्टिगा, 313 पल्सर आणि 200 अॅक्टिव्हा 30 कोटी रुपये खर्चून गाड्या खरेदी करण्यात आल्या. जुलै महिन्यात ही वाहने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना वाटण्यात आली. मात्र शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुलैमध्ये नवीन सरकार स्थापन झाले. शिंदे गटातील 40 आमदार आणि 12 खासदारांना 'वाय प्लस' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. त्यानंतरच निर्भया फंडांतर्गत खरेदी केलेल्या 47 बोलेरो या नेत्यांच्या एस्कॉर्टमध्ये ठेवण्यात आल्या. त्यापैकी 17 वाहने नंतर परत करण्यात आली मात्र 30 वाहने अद्याप परतली नाहीत. ही वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षा ताफ्यात वापरली जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंची टीका

"निर्भया निधीतून घेतलेली वाहने गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात आहेत. ही लाजीरवाणी बाब आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. दुसरीकडे महिला अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या निर्भया पथकाची वाहने आता गद्दारांच्या सुरक्षेसाठी कशी वापरले जात आहेत? यावर सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.