Uddhav Thackeray : सभेआधी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले

Uddhav Thackeray Sabha :  जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले होते.  

Updated: Apr 22, 2023, 03:10 PM IST
Uddhav Thackeray : सभेआधी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले title=

Uddhav Thackeray Sabha : ठाकरे गटाची जळगाव येथे रविवारी सभा होत आहे. मात्र, जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले होते. बॅनर्स लावत सभेआधी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.  मात्र या बॅनरबाजीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत हे बॅनर्स हटवले आहेत.

उद्धव ठाकरे यांची रविवारी पाचोरा येथे सभा

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे जळगावमध्ये दाखल झालेत. उद्या रविवारी उद्धव ठाकरेंची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे.  (Uddhav Thackeray Sabha in Jalgaon) त्यासाठी राऊत जळगावात गेले असता, गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले अन्यथा जळगाव आणि गुलाबराव पाटील काय आहेत हे संजय राऊत यांना दाखवून दिले असते, अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील यांनी दिली आहे. संजय राऊत यांना  काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

...त्यामुळे जळगावच्या सभेकडे लक्ष

जळगाव येथे संजय राऊत सभेच्या आधी एक दिवस जळगावमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांचे रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी इशारा दिल्यानंतर राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेय. गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसून दाखवावे आणि तुम्ही परत जाऊन दाखवा, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे जळगावच्या सभेकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार शहर दौरा अखेर रद्द झाला आहे. शहरातील छत्रपती रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री नंदुरबारला जाणार होते. मात्र या कार्यक्रमाची वेळ दुपारची होती. खारघर उष्माघाताच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला येणे टाळल्याची चर्चा आहे. प्रशासनाने या दौऱ्याची संपूर्ण तयारी केलेली होती. खारघर सारख्या उष्माघाताचे प्रकार नंदुरबारमध्ये घडू नये यासाठी आयोजकांनीही पूर्ण तयारी केली होती. मात्र, मोठ्या संख्येनं लोक येणार असल्याने पुन्हा खारघरसारखी घटना घडू नये म्हणून शिंदेंनी खबरदारी बाळगली, असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाला काही मंत्री हजेरी लावणार आहेत.