प्रणव पोळेकर / रत्नागिरी : मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. रत्नागिरीमध्ये तब्बल ८० किलोमीटर टप्प्यामध्ये रस्त्याची चाळण झाली आहे. याला जबाबदार कंपनीवर कोणतीच कारवाई होत नसल्यानं संताप व्यक्त होत आहे. चाळण झालेला हा कुठल्या खेडेगावातला रस्ता नाही तर तो आहे मुंबई गोवा महामार्ग. रत्नागिरी संगमेश्वर ते लांजा या ८० किलोमीटरच्या पट्ट्याची दयनीय अवस्था झाली. रस्ता शिल्लकच नाही.
या महामार्गावर खड्डे इतके खोल आहेत की कार मिनिटामिनिटाला आपटत असते. त्यामुळे एक तासाच्या प्रवासाला दुपटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. यामुळे चालक हैराण आहेत. संगमेश्वरच्या आरवलीपासून ते लांज्यातील वाकेड कामाचा ठेका एमइपी अर्थात मुंबई एन्ट्री पॉईंट इन्फ्रा कंपनीला देण्यात आलाय. मात्र गेल्या दोन वर्षात काहीच काम झालेलं नसताना कंपनीवर एवढी मेहेरबानी का, असं संतप्त सवाल नागरिक करतायत.
कशेळी ते परशुराम या टप्प्यात कल्याणी टोलवेज कंपनीकडून वेगात काम सुरू आहे. परशुराम ते खेरशेत या ४० किमीच्या टप्प्यातही ३० ते ४० टक्के काम पूर्ण होत आले आहे. काही ठिकाणी एका मार्गिकेवरून वाहतूकही सुरु झाली. आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड हे दोन टप्पे एमईएपी कंपनीकडे आहेत. तिथे पाच टक्केही काम झालेले नाही.
महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारीही कंत्राट असलेल्या कंपनीनेच पार पाडायची आहे. मात्र याकडेही एमईपी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनपैकी एका मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे तीन तेरा वाजलेत.