स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या केलेल्या ऑनलाईन बदल्यांच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाचे हे धोरण चुकीचे असून या बदली धोरणात अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याविरोधात कोकण विभागातील प्राथमिक शिक्षक संघटनेने कोकण भवन समोर धरणे आंदोलन केले. यात कोकण भागातील ठाणे, सिधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
महिला शिक्षिकांच्या बदल्या २०० ते २५० किलोमीटर दूर झाल्या आहेत. बहुतांशी महिला शिक्षकांच्या बदल्या या डोंगराळ भागात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवास सुरक्षित नसून घरापासून लांब रहावे लागत आहे. कोकणातल्या बहुतांशी शाळा या डोंगराळ भागात असून त्यांना डोंगरी भागाचा निकष लागू करावे. तसेच शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घोषणा केले आहे. याचा या शिक्षक संघटनांनी निषेध केला आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा या आदीवासी पाडे आणि डोंगराळ भागात आहेत. या बंद केल्यास येथील मुले शिक्षणापासून वंचीत राहतील. यामुळे या शाळा बंद करू नयेत अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.