ठाणे : मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढतो आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 13वर पोहचला आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाय-योजना केल्या जात आहेत. ठाण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कळवा-मुंब्रा-दिवा येथे वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाण्यात रविवारी आणखी दोन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.
तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 400वर पोहचली आहे. मुंबईत एका दिवसांत 81 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतोच आहे. राज्यात 24 तासांत 113 रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 748वर पोहचली आहे.
दरम्यान, वरळीत कोरोनाचा धोका वाढतोच आहे. वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे तिसरा बळी गेला आहे. वरळी कोळीवाड्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर पोहचली आहे. तर संपूर्ण वरळीत जवळपास 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 3374 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3034 लोक अद्याप कोरोनाबाधित असून त्यापैकी 266 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, देशभरात 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.