"...अन् शिंदेंनी चूक मान्य केली"; फडणवीसांचा खुलासा; 'सरकार पडेल असं वाटत असणाऱ्यांना'ही इशारा

Devendra Fadnavis On Pro Eknath Shinde Ad Campaign: शिंदे गटाने राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा यांचा फोटो होता ज्यावर 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे', असा मजकूर लिहिलेला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 29, 2023, 09:39 AM IST
"...अन् शिंदेंनी चूक मान्य केली"; फडणवीसांचा खुलासा; 'सरकार पडेल असं वाटत असणाऱ्यांना'ही इशारा title=
फडणवीस यांनी शिंदेंबरोबर चर्चा झाल्याची दिली माहिती

Devendra Fadnavis On Pro Eknath Shinde Ad Campaign: राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी घटकपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाने दिलेल्या एका जाहिरातीवरुन (Eknath Shinde Ad Campaign) वाद निर्माण झाला होता. या जाहिरातीमुळे भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिंदे गटाने अनेक वृत्तपत्रांमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात एका सर्वेक्षणाच्या आदारे दिली होती. या जाहिरातीमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो होता. या जाहिरातीमुळे शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचंही अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला होता.

मोठा वाद आणि तर्कवितर्क

'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीमुळे मोठा वाद झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी परस्पर विरोधी दावे केले होते. दुसऱ्याच दिवशी फडणवीसांबरोबरचा फोटो असणारी जाहिरात छापून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर आलेले शिंदे आणि फडणवीस एकमेकांशी फार बोलताना दिसले नाहीत. त्यावरुनही तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता या जाहिरात प्रकरणावर एका मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी थेट भाष्य केलं आहे. 

माझं आणि शिंदेंचं जाहिरातीबद्दल बोलणं झालं

ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी आपल्याशी संवाद साधल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच या संवादादरम्यान शिंदे यांनी जाहिरात छापण्याची चूक मान्य केली होती असंही फडणवीस म्हणाले. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते अशी माहिती फडणवीस यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. एकनाथ शिंदे आणि तुमच्यामध्ये मतभेद आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना  फडणवीस यांनी हे भाष्य केलं.

 

नक्की वाचा >> "पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण..."; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट

 

आमचे संबंध घट्ट

“आमच्यात (शिंदे आणि माझ्यात) कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. चुकीची जाहिरात छापली गेली, असं ते मला म्हणाले. आमच्या लोकांनी चूक केली, असंही त्यांनी मान्य केलं. एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत,” असंही फडणवीस यांनी मतभेदांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

 

नक्की पाहा >> Photos: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

 

सरकार पडेल असं वाटत असेल तर...

शिंदे आणि आपल्यात चांगले संबंध असण्यामागील कारणांचाही खुलासा फडणवीस यांनी केला. “ मी कधीही त्यांचा (एकनाथ शिंदेंचा) मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही. तसेच ते सुद्धा मी उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्ही दोघांनी (एकमेकांसंदर्भात) एक मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे आम्ही एकत्र पुढे जात आहोत. पक्षात किमान बुद्धीचे लोक असतात आणि कधीतरी अशीच लोक चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्याश्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीच शक्य होणार नाही. आम्ही हे सरकार एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने स्थापन केलं आहे,” असं सांगत फडणवीस यांनी शिंदे-भाजपा सरकारचा पाया मजबूत असल्याचं अधोरेखित केलं.