गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास 11 लाख तर काळे फासणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस !

Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला काही एसटी कर्मचारी आणि महिलांनी केला. या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Updated: Apr 17, 2022, 12:26 PM IST
गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास 11 लाख तर काळे फासणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस ! title=

जावेद मुलाणी / बारामती : Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला काही एसटी कर्मचारी आणि महिलांनी केला. या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास रोख 11 लाख तर त्यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेला 5 लाख रुपये आणि तोंडाला काळे फासणाऱ्या 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांना भडकावले आहे. कामगारांमध्ये हस्तक्षेप करुन एसटी कर्मचार्‍यांच्या भावना भडकवून भाषणे केलीत. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करुन संकट निर्माण केले. तसेच आमचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला  होता. तसेच पवार यांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत आहोत. भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्याची जीभ हासडणाऱ्यास  रोख स्वरूपात अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती तुकाराम चौधर यांनी दिली.

महिलांच्या रोजीरोटीचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्याच्या हातामध्ये जी महिला भगिनी बांगड्या घालेल तर त्या भगिनीस 5 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजार रुपयाचे बक्षीस देखील बारामतीत जाहीर करण्यात आले आहे. आज बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील महिला आणि कामगारांनी सदावर्तेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता.(Gunaratna Sadavarte Against Protest march) यावेळी ही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.