शिवसैनिकांचे आंदोलन आणि नवनीत राणा यांचा इशारा, म्हणाल्या तर.. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावरून खासदार नवनीत राणा यांनी हा इशारा दिलाय. 

Updated: Apr 17, 2022, 12:36 PM IST
शिवसैनिकांचे आंदोलन आणि नवनीत राणा यांचा इशारा, म्हणाल्या तर.. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर title=

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चाळीस पठण करण्याचा इशारा दिला होता. यावरून अमरावती येथील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

सकाळी या शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठा प्रमाणात होती. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय.

घरावर मोर्चा काढणारे हे सगळे माझ्या जिल्ह्यातील लोक आहेत. काल आम्ही लाऊडस्पीकर लावला. पण, कुणालाही कुठे बोलायला मनाई नाही. मी हनुमान चालीसा सार्वजिनक ठिकाणी वाचते. पण, आज ज्या पद्धतीने आहे राजकारण सुरु आहे ते पाहून मुख्यमंत्री हिंदुत्व विसरले का? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री यांनी आजपर्यंत ज्यापद्धतीने वाटचाल केली आहे ती पाहता आपण हिंदुत्ववादी आणि हनुमान चाळीस याला विरोध का करताय? असा प्रश्न मला त्यांना करायचा आहे. वाचन करण्याला विरोध करण्यासाठी आपण मला 'मुर्दाबाद' म्हणत असाल तर हे मुर्दाबाद आम्हाला मान्य आहे. 

 

ज्या संस्कृतीत मी मोठी झाली. ते हिंदू राष्ट्र आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे माझं काम आहे. उद्धव ठाकरे यांची तिसरी पिढी राजकारणात आहे. बाळासाहेब यांची विचारधारा आपण सोडली का? आम्ही काल पूर्ण दिवस मुख्यमंत्री आता हनुमान चालीसा वाचतील याची वाट पाहिली. पण, ते काही दिसले नाहीत. 

मुख्यमंत्री हिंदुविरोधी आहेत का? बाळासाहेब यांची विचारधारा सोडली का? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहोतच. त्यांनी वेळ द्यावा, कितीही जोर लावावा. मी ही मुंबईतच वाढली आहे. माझी संस्कृती जपताना मला मरण आले तरी चालेल. पण, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर पाठ करणार  म्हणजे करणारच असा इशाराही त्यांनी दिला.