जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : दहनघाटावर जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. महेश कोटांगळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नागपूरच्या जयताळा परिसरातील दहन घाटावर त्याने आत्महत्या केली. जयताळा परिसरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पार्वताबाई बनकर यांचे निधन झाले होते. शनिवारी संध्याकाळी जयताळा दहनघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार आटोपून पार्वताबाई यांचे कुटुंबीय व नातेवाईक निघून गेल्यावर दहन घाटावर शेजारील वस्तीतील काही मुले खेळत होती.
अचानक ३४ वर्षीय महेश कोटांगळे तिथे आला व त्याने जळत असलेल्या चितेत उडी मारली. तिथे खेळत असलेल्या मुलांनी याची माहिती वस्तीतील नागरिकांना दिली. वस्तीतील काहीजण घटनास्थळावर पोहचले मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. काठीच्या साह्याने लोकांनी त्याला चितेपासून दूर केले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली...
पोलिसांनी घटनास्थळ गाठून महेशला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी महेशला तपासून मृत घोषित केले. महेश हा अविवाहित असून काही वर्षांपासून तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महेश हा मजुरीचे काम करत होता. दहन घाटाच्या शेजारीच असलेल्या रमाबाई नगरात तो वृद्ध आई वडिलांसोबत राहत होता. पोलिसांनी आत्महत्येच्या गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.