Pune Accident : पुण्यातून (Pune News) एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सळई पडल्याने मृत्यू झाला आहे. पुण्यातील बाणेरमध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
बाणेर परिसरातील गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या रस्त्यावरुन एक शाळकरी मुलगा जात होता. त्यावेळी लोखंडी सळई त्या मुलाच्या डोक्यात पडली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. रुद्र केतन राऊत असे त्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.
बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास इमारतीतील एक तुळई डोक्यात पडल्याने शाळेतून पायी घरी जात असलेला रुद्र राऊत हा जखमी झाला होता. तो बाणेर येथील वीरभद्र नगर येथे राहायला होता. घरी जात असताना त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी इमारत बांधली जात असतानाही तिला अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांसह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीतील बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, या कामामुळे भविष्यात मुख्य रस्त्यांवर आणि चौकांवर वाहतूक समस्या आणि अपघात वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"नऊ वर्षांचा मुलगा रुद्र राऊत त्याच्या आईसोबत हे दोघेजण ऑर्चेड स्कूलमधून बाणेर येथे घरी चालले होते. फुटपाथवरुन जात असताना एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन एक लोखंडी रॉड तुटून मुलाच्या डोक्यावर पडला. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी रात्री भादवि 308 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण दुसऱ्या दिवशी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर यासोबत मनुष्यवधाचा गुन्हा देखील जोडण्यात आला आहे. यामध्ये साईटवर काम करणारे कामगार, बिल्डिर आणि संबधित इंजिनिअरवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बालाजी पांढरे यांनी दिली.