पुण्याच्या एअरफोर्स स्कूलमध्ये सापडलेली ती वस्तू 'हॅन्ड ग्रेनेड'?

ही वस्तू नेमकी काय आहे?  ती हातबॉम्ब आहे की आतिषबाजीचा फटाका? ती वस्तू इथे आली कुठून? आणि कशी?

Updated: May 15, 2019, 03:03 PM IST
पुण्याच्या एअरफोर्स स्कूलमध्ये सापडलेली ती वस्तू 'हॅन्ड ग्रेनेड'?  title=

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पुण्यातील हवाई दलाच्या शाळेच्या मैदानावर सापडलेल्या हातबॉम्बसदृश वस्तुबदद्लचा संशय वाढलाय. ती वस्तु फटाका असल्याचे सांगण्यात येत असले तरी तिचं स्वरुप बघता ती इम्प्रोवाइज्ड हॅण्डग्रेनेड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर फोर्स स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय.  

पुण्यातील हवाई दलाच्या शाळेच्या मैदानावर हॅण्डग्रेनेड सदृश वस्तू सापडलीय. मंगळवारी सकाळी शाळेतील मुलं मैदानावर खेळत असताना हा प्रकार समोर आला. ही वस्तू नेमकी काय आहे?  ती हातबॉम्ब आहे की आतिषबाजीचा फटाका? ती वस्तू इथे आली कुठून? आणि कशी? शाळेच्या मैदानात सापडलेल्या हॅण्डग्रेनेड सदृश वस्तूबाबत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


नेमकी काय आहे ही वस्तू?

पुण्यातील लोहगावमध्ये हवाईदलाचा तळ आहे. हा तळ म्हणजे लष्कराचे अतिशय महत्त्वाचे  केंद्र आहे. याच परिसरात एअर फोर्स स्कूल या नावाने ओळखली जाणारी हवाई दलाची शाळा आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान मुलं शाळेच्या मैदानावर खेळत होती. त्यावेळी त्यांना मैदानावर एक संशयास्पद वस्तू पडलेली दिसली. मुलांनी शाळेतील शिक्षकांना त्याविषयी माहिती दिली. हवाई दलाला त्याविषयी कळवल्या नंतर हवाईदलाचे अधिकारी तातडीनं त्याठिकाणी दाखल झाले. शाळेतील सर्व मुलांना शाळेबाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या बीडीडीएस म्हणजे बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. त्यांच्याकडील 'विराट' या श्वानाने तिथे स्फोटके असल्याचे संकेत दिले. त्यानुसार बीडीडीएस पथकाने ती वस्तू अतिशय काळजीपूर्वक निकामी केली. त्या वस्तुतील स्फोटकांचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेकडे परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. हवाई दलाचे अधिकारी आणि पुणे पोलसांनी संयुक्तरित्या ही कार्यवाही केली. 

पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी याविषयी माहिती दिली. 'सकाळी ९. ३० च्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. एअरफोर्स स्कुलच्या मैदानात संशयास्पद वस्तू आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आमचे बीडीडीएस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ती वस्तू हॅन्ड ग्रेनेडसारखी दिसत होती. बीडीडीएसच्या श्वानाने त्यात स्फोटके असल्याचे संकेत दिले. बीडीडीएस पथकाने ती वस्तू सुरक्षितपणे निकामी केली. तिचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत' अशी माहिती त्यांनी दिली. 
  
यात्रा, जत्रांमध्ये शोभेची दारू उडवली जाते. त्यासाठी असे फटाके वापरले जातात. हातबॉम्ब सदृश वस्तूमध्ये वापरण्यात आलेली स्फोटके केवळ फटाक्यात वापरण्यासाठीची आहेत? की आणखी काही? याचा तपास सुरु आहे. 
एअर फोर्स स्टेशनचा संपूर्ण परिसर संरक्षित आहे. तिथे ही वस्तू कशी आली त्याचा तपस हवाई दलातर्फे करण्यात येत आहे.   

भारतीय हवाई दलाकडून एका ट्वीटमार्फत या घटनेची माहिती देण्यात आली. एअर फोर्स शाळेच्या मैदानात हॅण्डग्रेनेडसदृश वस्तू आढळून आली होती. हवाई दल आणि पुणे पोलीस यांनी मिळून ती निकामी केली असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.    

घटनेचे गांभीर्य तसेच संवेदनशीलता लक्षात घेता त्याबाबतची माहिती प्रसारित करण्यावर मर्यादा आहेत. संरक्षण दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या लोहगाव हवाई दल तळ परिसरात हा प्रकार घडलाय. त्यामुळे जोपर्यंत त्याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत संशयास्पद वस्तूबद्दलचे गूढ कायम राहणार आहे.