Pune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: May 13, 2023, 09:20 AM IST
Pune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप title=

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.

किशोर आवारे यांची आई सुलोचना गंगाराम आवारे (69) यांनी शुक्रवारी रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला. सुलोचना आवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, श्याम निगडकर, संदिप गरड आणि इतर तिघे जण तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून, भारतीय दंड संहिता आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, किशोर आवारे यांनी आंदोलन केले आणि आमदार सुनील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित चुकीच्या कृतींविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सुनील, सुधाकर आणि संदिप यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे किशोर गेल्या सहा महिन्यांपासून मला सांगत होता, असा दावा सुलोचना यांनी केला.

 

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, इतर आरोपी, श्याम निगडकर आणि त्याच्या साथीदारांनी किशोरवर गोळीबार केला आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी सांगितले की, हत्येच्या तपासासाठी गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओवरून पोलिसांना हल्लेखोरांबाबत सुगावा लागला आहे.

दरम्यान, मावळमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार किशोर आवारे हत्येप्रकरणी श्याम निगडकर व त्याचे 3 साथीदार यांच्यासह मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे हत्येप्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कट रचल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी केला आहे. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून पुढील पोलीस तपासात जे आरोपी सिद्ध होतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याबाबत आमदार शेळके यांना संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ असल्यानं त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.