मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन

Pune Sucide and Murder: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2024, 09:27 PM IST
मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन title=
Pune Sucide and Murder

Pune Sucide and Murder: कल्याणचे पूर्व विभागाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात महेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. पैसा, प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात होता. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरेस भाईने गोळ्या झाडल्या आणि स्वत:ही आत्महत्या केली. लागोपाठ घडलेल्या या 2 घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. त्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

आर्थिक वादातून सराफ व्यवसायिकाने दुकानमालकावर  गोळीबार केला. आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. तर आकाश गजानन जाधव (वय 39,  रा. बाणेर)  असे मृत पावलेल्या दुकानमालकाचे नाव आहे. 

अनिल ज्वेलर्स नावाचे दुकान अनिल ढमाले चालवत होते.तर आकाश जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना 14 वर्षांपासून  दुकान भाड्याने दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. 

तीन महिन्यापासून ढमाले याला जाधव हे आर्थिक कारणावरुन त्रास देत होते, असे सांगितले जात आहे. आता  मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचे ढमाले यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळले आहे. गोळीबारानंतर ढमाले यांनी स्वतः गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकाराने पुण्यातील औंध भागात खळबळ पसरली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय आहे घोसाळकर हत्या प्रकरण?

मुंबईमधील दहिसर येथे उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस भाईने गोळ्या झाडून हत्या केली. फेसबुक लाईव्ह सुरु असतानात त्याने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. मॉरिसच्या ऑफिसच्या बाजुलाच अभिषेक यांचं ऑफिस आहे. मॉरिसने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, ज्यात महिलांना साड्यांचं वाटप करण्यात येणार होतं. त्याआधी मॉरिसने अभिषेक यांना त्याच्या ऑफिसमध्ये नेलं. मॉरिस याच्यावर बलात्काराचे आरोप होते. या आरोपाखाली त्याने शिक्षाही भोगली होती. घोसाळकरांमुळे आपण ही शिक्षा भोगली असा समज मॉरिसचा होता, असे त्याच्या पत्नीने सांगितले. या सुडाचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. फेसबूक लाइव्ह संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहताय असे दिसत होते. इतक्यातच त्यांना गोळ्या लागल्याचे दिसले. पाच गोळ्यांचा आवाज यावेळी आला. यानंतर मॉरिसने स्वत:चे आयुष्यही संपवले.