Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद

Pune Crime  : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे

Updated: Apr 2, 2023, 12:03 PM IST
Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद title=

चैत्राली राजापूरकर, पुणे, झी मीडिया : पुण्यात (Pune News) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. टोळीयुद्धात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना घडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कोयता गॅंगची दहशत काही प्रमाणात अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) विद्यमान सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील (maval taluka) प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमध्ये सरपंचाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्याने वार करून हत्या केली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या सरपंचाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण गोपाळे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचांचे नाव असल्याचे समोर आले आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी रात्री साईबाबा मंदिरात प्रवीण गोपाळे आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी धारदार कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवीण गोपाळे यांनी पळ काढला. त्यानंतर आरोपींनी गोपाळे यांचा पाठलाग करत त्यांना गाठले आणि त्यांच्यावर पुन्हा वार करत हत्या केली. गोपाळे हे भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर गोपाळे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. 

नेमकं काय घडलं? 

दुसरीकडे गोपाळे यांच्या हत्येचे सीसीटीव्हा फुटेजही आता समोर आले आहे. केवळ 25 सेकंदात गोपाळे यांची हत्या करुन आरोपींनी पळ काढला. साई बाबांच्या मंदिरासमोर गोपाळे हे आणखी एका व्यक्तीसोबत बाईकजवळ उभे होते. त्यावेळी 9 वाजून 6 मिनिटांनी एका दुचाकीवरून आधी दोघे जण गोपाळे उभे असलेल्या रस्ताने पुढे गेले आणि युटर्न घेऊन निघून गेले. पुन्हा 9 वाजून 8 मिनिटांनी तिघेजण दुचाकीवर आले आणि त्यांनी पुन्हा पुढे जाऊन युटर्न घेतला आणि गाडी गोपाळे यांच्याजवळ थांबवली. त्यानंतर आरोपींनी पहिला वार गोपाळे यांच्या डोक्यावर केला. त्यामुळे घाबरलेल्या गोपाळे यांनी तिथून पळ काढला. मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना गाठलं आणि गोपाळे यांची निर्घृण हत्या केली. 

जमिनीच्या प्लॉटिंगवरून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय. मात्र हल्लेखोरांना बेड्या ठोकल्याशिवाय हत्येचे मूळ कारण समोर येणार नाही. शिरगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती आणि राष्ट्रवादीचे प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी निवडून झाले होते.