सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँग (koyta gang) प्रचंड सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात कोयता गँगकडून (Pune Crime) दहशत माजवण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाईचा बडगा उगारला असला तरी कोयता गँगला आळा बसताना दिसत नाहीये. अशातच पुन्हा एकदा पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. कोयत्याने तरुणावर वार करुन त्याचा मनगटापासून पुढील पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज येथे घडला आहे.
पुण्याच्या अत्यंत वर्दळीच्या अशा कात्रज भागात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने अखिलेशवर शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला आहे. मात्र भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिक दहशतीच्या छायेखाली आहेत.
बुधवारी दुपारी साडेचार वाजता कात्रज येथील सुखसागरजवळील स्मार्ट मेन्स पार्लरसमोर ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अभिजीत दुधनीकर (23) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व त्याचे साथीदार हे अट्टल गुन्हेगार आहेत. तक्रारदाराने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. तक्रारारदार अभिजीत दुधनीकर आणि लाडप्पा हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना वाटेत अडवले. तुम्ही केस करता का आमच्यावर, थांबा आता तुमचा मर्डरच करतो, असे धमकावून आरोपींनी दोघांवर हल्ला करत वार केले. तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असाता आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
तितक्यात आरोपीने लाडप्पा याच्यावर कोयत्याने वार केला. कोयत्याचा वार अडवण्यासाठी लाडप्पाने डावा हात पुढे केला. मात्र हल्ल्यात त्याचा मनगटापासून पंजा तुटला. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता लाडप्पाच्या उजव्या हाताच्या पंजावरही वार करुन त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ लाडप्पा याचा तुटलेला पंजा शस्त्रक्रिया जोडला आहे.