Pune Crime : पुण्यात (Pune News) स्कूटर आणि कॅबच्या धडकेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) स्कूटरचालकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी बाणेर रोडवरील पेट्रोल पंपावर दुपारी 4.20 च्या सुमारास झालेल्या किरकोळ अपघातानंतर 22 वर्षीय स्कूटर चालकाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या मित्रावर चतुश्रुंगी पोलिसांनी कॅब चालकाला मारहाण करून त्याची भाड्याची गाडी पळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून पळवून नेलेली कारदेखील जप्त केली आहे.
सोहन प्रकाश डोंगरे असे स्कूटर चालक आरोपीचे नाव आहे. डोंगरे हा औंध, बाणेर आणि पाषाण भागात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्याचे काम करतो. सध्या सुरू असलेल्या पुणे मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे, बाणेर रोडवरुन एका बाजूने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जंक्शनपर्यंत वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बाणेरहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी या मार्गाच्या उजव्या बाजूला पेट्रोल पंप आहे. मंगळवारी आरोपी डोंगरे त्याच्या चुलत भावासह पेट्रोल पंपावर जाण्यासाठी रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जात होता. त्यावेळी कॅबचालक तुषार कोळेकर (29) रिव्हर्स घेत होते. याचदरम्यान, कारची स्कूटरला धडक बसली आणि त्यामुळे डोंगरे आणि त्याचा चुलत भाऊ खाली पडले.
त्यानंतर उभं राहून दोघांनीही तुषार कोळेकरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने कोळेकर याच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या. यासोबत कोळेकर याला मारहाण देखील करण्यात आली. यानंतर डोंगरे ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्यानंतर त्याच्या मित्राने स्कूटर घेऊन पळ काढला. तर तिथे पोहोचलेल्या डोंगरेच्या मित्राने त्याच्या चुलत भावाला बाईकवरुन रुग्णालयात नेले.
"ही घटना घडली तेव्हा स्कूटरवर दोन लोक होते. त्यानंतर डोंगरेने आणखी दोघांना तिथे बोलावून घेतले. त्यांनी मला जवळच्या शोरूममध्ये नेले. स्कूटरच्या दुरुस्तीसाठी 55,000 मागितले. माझ्यासाठी हे खूप पैसे होते कारण मी महिन्याला फक्त 9,000 रुपये कमावतो. म्हणून, मी त्यांना तिथल्या एका गॅरेजमध्ये कमी खर्चात दुरुस्ती करुन देतो अशी विनंती केली. पण त्यांनी नकार दिला आणि तिथून निघून गेलो, असे पीडित कोळेकर यांनी सांगितले.
काही वेळाने कोळेकर यांनी मित्राला पेट्रोल पंपाजवळ गाडी उभी आहे का ते तपासण्यास सांगितले. कोळेकर यांच्या मित्राला तिथे गाडी दिसली नाही. त्यांनी मालकाला सांगून कारचा जीपीएस तपासले असता ती पाषाणमध्ये असल्याचे दिसून आले. कोळेकर यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी डोंगरे आणि त्याच्या मित्राविरुद्ध कलम 392 (दरोडा) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आला आहे.