पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी

Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Updated: Aug 16, 2024, 09:35 PM IST
पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी title=
पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे: पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 25 ते 41 वयोगटातील लोकांकडून सर्वाधिक ड्रग्स घेतले जात असल्याची माहिती समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्स खरेदी केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी थेट ड्रग्स सेवन करणाऱ्याच्या घरी जाऊन चौकशी आणि समुपदेशन करणार आहेत

135 मोठ्या कारवाया करून 193 जणांना अटक

शांत आणि सुसंस्कृत पुण्यात ड्रग्सचां काळा बाजार हा दिवसान दिवस वाढतच चालाय की काय? असा सवाल उपस्थित होतोय.अनेक तरुण-तरुणी ड्रग्ज सेवन करत असलेल्या घटना या सातत्याने समोर येत आहेत या वर्षभरात पुणे पोलिसांनी 135 मोठ्या कारवाया करून 193 जणांना अटक केली. त्यात 172 पुरूष 12 महीला आणि 9 परदेशी आहेत.आतापर्यंत पुणे पोलिसांनी काय कारवाई केली याचा तपशील जाणून घेऊया. 

कोणता किती साठा जप्त?

गांजा प्रकरणी 59 गुन्ह्यात 1058 किलो 322 ग्राम असा 2,12,08,855 रुपये किमतीचा साठा, कोकेन प्रकरणात 6 गुन्हे 237 ग्राम असा 47,82000 रुपये किमतीचा साठा,चरस 6 गुन्हे 3 किलो 180 ग्राम असा 57,51,940 रुपये किमतीचा साठा,एमडी 42 गुन्हे 3 किलो 509 ग्रॅम असा 6,98,42,600 रुपये किमतीचा साठा, अफिन 9 गुन्हे 121किलो 136 ग्रॅम असा 1,18,64,300 रुपये किमतीचा साठाlहेरॉईन 1 गुन्हा 312 ग्रॅम असा 46,89,000 रुपये किमतीचा साठा असा एकूण 13,61,00,935 रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आलाय.

पोलिसांकडे यादी

या धक्कादायक आकडेवारी नंतर पुणे पोलिसांनी थेट ड्रग्स सेवन करणाऱ्याच्या घरी जाऊनच चौकशी आणि समुपदेशन करण्याची मोहीम हाती घेतली महत्त्वाचं म्हणजे ड्रग्ज सेवन करणाऱ्या 119 जणांची यादीच आता पोलिसांकडे आहे. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीकडून हा तपशील मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

तरुणी आणि तृतीयपंथीय देखील मोठ्या प्रमाणात घेतात ड्रग्ज

पोलिसांनी केलेल्या तपासात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले आहे तर तरुणी आणि तृतीयपंथीय देखील ड्रग्स घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय त्यामुळे पुणे पोलिसांनी समुपदेशन मोहीम हाती घेतली आहे.