पुणे : कोरोनाच्या तपासणीसाठी आता मेड इन इंडिया किटस तयार झालीयत. पुण्याच्या 'माय लॅबनं' आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांतं मेड इन इंडिया किट तयार केलं. हे किट आता बाजारात उपल्बध आहे. दरम्यान माय लॅबच्या टीमध्ये काम करणाऱ्या पुण्याच्या मिनल दाखवे भोसले यांचे सध्या सर्व स्तरातून कौतूक होतंय. ९ महिन्याची गर्भवती असताना देखील त्यांनी हे किट पूर्ण करण्याचे काम केलं. नुकताच त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन मिनल यांच कौतूक केलंय.
देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कमी पडतायत. त्यावर पुण्यातल्या 'माय लॅब' डिस्कवरी सोल्युशन्स कंपनीनं संशोधन करुन मेड इन इंडिया टेस्ट किट विकसीत केलं. या टेस्टिंग किटला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थांची मान्यता देखील मिळाली. मिनल भोसले याच टीमचा हिस्सा आहेत. या कंपनीत त्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख आहेत. हे किट तयार होण्यासाठी चार महिन्यांचा वेळ लागणार होता. मिनल यांच्या डिलीव्हरीची तारीख देखील जवळ येत होती. त्यांनी जोमाने काम करत अवघ्या सहा आठवड्यात हे किट तयार केलं. १८ मार्चला हे टेस्टिंग किट तयार झालं. आणि अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी बाळाला जन्म दिला.
एका आठवड्यात एक लाख किट्स बनवण्याची लॅबची क्षमता आहे. एका किटमध्ये १०० टेस्ट होणार आहेत. एका लॅबमध्ये दिवसाला १००० नमुने तपासणं शक्य होणार आहे. परदेशातून येणाऱ्या किटसच्या तुलनेत या किटची किंमत फक्त एक चतुर्थांश आहे. या किटच्या मदतीनं फक्त अडीच तासात रिपोर्ट येणार असल्याचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे यांनी सांगितले.
सध्या आपल्या देशात ही टेस्टिंग किटस जर्मनीमधून मागवली जात होती. दिवसाला केल्या जाणाऱ्या टेस्टच्या संख्येत भारत सध्या पिछाडीवर आहेपण माय लॅबच्या या संशोधनामुळे कोरोनाविरोधातल्या लढ्यात अत्यंत मोलाची मदत झालीय.