पुणेः प्रियकराने डोळ्यांवर पट्टी बांधून दिल्लीला पळवून नेल्याची तक्रार काहि दिवसांपूर्वी चंदननगर पोलिसांकडे आली होती. प्रकरणाची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दिल्लीत धाव घेतली. मात्र, तिथे गेल्यावर भलतंच घडलं. या प्रकारामुळं पोलिसही तक्रावले आहेत.
प्रेमसंबंधातून २२ वर्षाच्या आपल्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून तिला तेथे डांबून ठेवले आहे. तिने लोकेशन पाठविले असल्याची तक्रार एका तरुणीने आपल्या ऑफीसमध्ये केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली होती.
लव्ह जिहाद, केरळा स्टोरी असे गंभीर विषय सध्या गाजत असताना त्यात पळवून नेणारा मुस्लिम धर्मिय म्हटल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले होते. पोलीस पथक पहिल्या विमानाने दिल्लीत पोहचले. त्यांनी लोकेशनवर शोध घेतला तर या तरुणीची मैत्रिणी आढळून आली. मात्र, तिच्याबाबत असा कोणताही प्रकार झाला नसल्याची तिने म्हटले. त्यामुळे पोलिस चक्रावून गेले.
पोलिसांनी पुन्हा पुण्यातील या तरुणीची आपल्या पद्धतीने विचारणा केल्यावर तिने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले.
याबाबत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्यावरुन उद्भवणाऱ्या सामाजिक प्रश्नाचा विचार करुन तातडीने दिल्लीला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांचे पथक पाठविले. तेथे चौकशी केल्यावर या सर्व प्रकराचा उलगडा झाला.
पुण्यात पोलिसांना माहिती देणाऱ्या तरुणीचे ब्रेकअप झाले होता. तिचा बॉयफ्रेड तिला त्रास देत होता. त्यावेळी तिने ११२ वर कॉल केला होता. परंतु, तिला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावरुन ती पोलिसांवर चिडली होती. त्यामुळेच तिने हा प्लॅन रचला. पोलिसांचा विश्वास बसावा, म्हणून तिने दिल्लीतील आपल्या मैत्रिणीला काही न सांगता केवळ तिचे लोकेशन मागून घेतले होते. या सगळ्या गोंधळामुळं पोलिसांची मात्र धावपळ झाली.
तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या ऑफिसमध्ये काम करणारी तरुणीचे सैफ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आरोपी सैफ याने लग्न करण्याच्या अमिषाने तिला पळून नेले. मात्र पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे कळले व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तिच्या मैत्रिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. मी इथून निघून येत आहे असंही तिने मैत्रिणीला सांगितले, असं तरुणीने पोलिसांना म्हटलं होतं. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांना लगेच दिल्ली गाठली मात्र तिथला प्रकार ऐकून ते चक्रावले.