पुणे : मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) आज अध्यक्ष राज ठाकरेंना भेटणार आहेत. वसंत मोरे पुण्याहून मुंबईकडे रवाना झालेत. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांनी आपल्याला सर्वच पक्षांकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. आता राज ठाकरेंना भेटल्यानंतर ते पुढील दिशा ठरवणार आहेत.
राज ठाकरे जे विचारतील त्याबाबतीत चर्चा करेन, संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले, यात मला शंभर टक्के यश मिळालं आहे. या यशामुळे काही पार्टटाईम जॉबवाले नाराज झाले होते. त्यांच्यामुळे थोडी अडचण झाली, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
या पार्टटाईम जॉबवाल्यांबद्दल आज राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागातील अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचंही वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.
वसंत मोरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्था या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याआधी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होती, पण त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर आज राज ठाकरे यांनी आज वसंत मोरे यांना भेटीची वेळ दिली असून या भेटीनंतर वसंत मोरे आपली पुढची दिशा स्पष्ट करतील.