Pune News : समाजात वाढत्या जागृतीमुळे लोकांकडून आता अवयवदानासाठी पुढाकार घेतला जात आहे. पुण्यातही एका अवयवदात्याने अवयदानाचे श्रेष्ठ दान केलं होतं. मात्र गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत असताना अॅम्ब्युलन्सचा अपघात झाल्याने अनेकांना धक्का बसला. पण जखमी अवस्थेत डॉक्टरांनी रुग्णापर्यंत हा अवयव पोहोचवला आहे. पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुस घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला शहरातील विमानतळाकडे जाताना अपघात झाला. त्यानंतरही, शल्यचिकित्सक आणि त्यांच्या पथकाने चेन्नईतील एका रुग्णाचे प्राण वाचवले. चेन्नईत काही तासांनंतरच फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले.
पुण्यातील ब्रेन डेड रुग्णाचे फुफ्फुस चेन्नई इथल्या रुग्णालयात असलेल्या 26 वर्षीय तरुणावर प्रत्यारोपित केले जाणार होते. फुफ्फुसे घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्समधून डॉक्टरांचे पथक विमानतळाकडे रवाना झाले होते. मात्र, वाटेतच अॅम्ब्युलन्सचा टायर फुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेतून जाणारे डॉक्टरांचे पथकदेखील जखमी झाले. मात्र स्वत:च्या जीवाची काळजी न करता जखमी डॉक्टरांनी तशाच अवस्थेत विमानप्रवास केला आणि चेन्नईत पोहोचून तरुणाची शस्त्रक्रिया केली.
या सगळ्या प्रकारानंतर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर किती प्रयत्न करत असतात हे नवी मुंबईतील एका रुग्णालयात असलेल्या डॉ.संजीव जाधव यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. डॉ.संजीव जाधव यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चेन्नईत 26 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवले आहेत. डॉ. जाधव त्यांच्या पथकासह पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून 19 वर्षीय ब्रेन डेड रुग्णाच्या फुफ्फुस काढण्याच्या ऑपरेशनसाठी पुण्यात आले होते. तिथून त्यांना या फुफ्फुसांसह चेन्नई गाठायचे होते. चेन्नईतील रुग्ण गेल्या 70 दिवसांपासून निकामी फुफ्फुसांशिवाय मृत्यूशी झुंज देत होता.
सोमवारी पिंपरीतून पुणे विमानतळाच्या दिशेने जात असताना डॉ. संजय जाधव यांच्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. दापोडीतल्या एका पुलावर संध्याकाळी अॅम्ब्युलन्सचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातमुळे डॉ.जाधव आणि त्यांच्या पथकाला गंभीर दुखापत झाली. मात्र चेन्नईतल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. जाधव यांनी तात्काळ खासगी टॅक्सीतून पुणे विमानतळ गाठले आणि विमान पकडले. चेन्नईला पोहोचून डॉ. जाधव आणि त्यांच्या पथकाने तरुणावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून त्याला वाचवले.