'सर्वजण खडकावर उभे होते, आणि अचानक..' भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या अन्सारी कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

Lonavala Bhushi Dam Accident : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये वर्षा सहलीसाठी आलेले एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली होती. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत नातेवाईकांनी माहिती दिली आहे.  

राजीव कासले | Updated: Jul 1, 2024, 11:09 AM IST
'सर्वजण खडकावर उभे होते, आणि अचानक..'  भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या अन्सारी कुटुंबासोबत नेमकं काय घडलं? title=

Lonavala Bhushi Dam Accident : लोणावळ्यात (Lonavla)वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला. भुशी डॅमच्या (Bhushi Dam) मागील धबधब्यावर मौजमजा करताना अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत. त्यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात अन्सारी कुटुंब राहत होतं. धबधब्याच्या मध्यभागी उभं राहून त्यांनी जीव कसा धोक्यात घातला याचा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय.

घटनेचा नवा व्हिडिओ समोर
भुशी डॅम बॅक वॉटरफॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. धबधब्यात 10 जण अडकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते. बाहेरील काही नागरिकांनीही यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टीकू शकले नाहीत. त्यामुळे सगळेजण वाहून गेले. यात पाच जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र, 5 जण वाहून गेले. यातील तिघांचा मृतदेह हाती लागलाय. तर दोघांचा शोध सुरू आहे. भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. 

अन्सारी कुटुंब तिथे का गेलं होतं?
 पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात अन्सारी कुटुंब राहत होतं.  वर्षा सहलीसाठी हे कुटुंब इथं आलं होतं. अन्सारी कुटुंबात 27 तारखेला लग्नसमारंभा पार पडला होता. यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आल्याने त्यांनी लोणावळ्यात वर्षा सहलीचा बेत आखला. लोणावळ्यांतर एक जूलैला त्या सर्वांनी मुंबई फिरण्याचा प्लान आखला होता. लोणावळ्यात 17 जणांचं कुटुंब इथे फिरण्यासाठी आलं. यातले नऊ जण पाण्यात उतरले होते. यापैकी चार जण बाहेर पडले. पण पाच जण तिथेच अडकले.

काय झालं नेमकं त्यावेळी?
लोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. तिथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो. दुर्घेटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्याने अन्सारी कुटुंबा तिथल्या खडकावर उभं राहून मजा मस्ती करत होते. पण मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एका महिला, दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावरच अडकले. त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. पण दु्र्देवाने पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेले. यापैकी तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. 

हा परिसर धोकादायक असतानाही अनेकवेळा पर्यटक इथे येतात. पूर्ण जंगल पार केल्यानंतर इथे पोहोचता येतं.