मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होण्याची शक्यता आहे. गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2024, 10:30 AM IST
मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना title=
increasing local trains in mumbai minister of railways ashwini vaishnaw Instructions to central and western railways officers

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक  लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस लोकलची गर्दी वाढत चालली आहे. अनेकदा लोकलमधून पडून अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी वारंवार केली जाते. आता ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गर्दीमुळं अनेकदा प्रवाशांना नीट उभं राहण्यासाठीही जागा नसते. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुलभ व्हावा यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत असतात. रेल्वेने 15 डब्यांच्या गाड्या सोडल्या आहेत. मात्र तरीही गर्दी तसूभरही कमी होत नाही. मध्य रेल्वेवरील कल्याण-डोंबिवली तसंच, पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. इथून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना उभं राहण्यासही जागा नसते. त्यामुळं वसई-विरार येथून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना मुंबी लोकल फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रशासनाला लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर दैनंदिन फेऱ्या कशा वाढवण्यात येतील यावर काम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतर आता लवकरच मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत, अशी माहिती कळतंय. त्यामुळं लवकरच आता मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. लोकलमधून पडून अनेकांनी जीव गमावला होता. या वारंवार होणाऱ्या अपघातामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

रेल्वेनंत्री अश्विनी वैष्णव हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मान्सूनच्या तयाराचा आढावा घेतला होता. मध्य रेल्वेचे लोकलचे आणि एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडल्याचे चित्र होते. त्यावेळी अश्विनी वैष्णव यांनी याची पाहणी केली तसंच, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. या बैठकीत अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्याचे सांगण्यात येतंय. 

प्रवाशांनी वारंवार लोकल विस्कळीत असते, वेळेवर धावत नाही त्यामुळं कामावर जायला उशीर होतो अशा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळं लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी  अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याविषयी माहिती घेतली. तसंच, येत्या काळात लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशा सूचना दिल्या. त्यामुळं लवकरच अधिकारी या निर्णयावर चर्चा करुन लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.