Pune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू

Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे

Updated: Jan 4, 2023, 01:06 PM IST
Pune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा  600 फूट दरीत कोसळून मृत्यू title=

Pune Varandh Ghat Teacher Death Pune News : सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांचा जीव गेले आहेत. मोबाईलमध्ये सेल्फी काढत असताना आपण कुठे काय करतोय याचं भान अनेकांना राहत नाही. मात्र आता सेल्फी काढत असताना चक्क एका शिक्षकाने जीव गमावला आहे. पुण्यात (Pune News) भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात सेल्फी काढण्याच्या नादात हा शिक्षक 600 फूट खोल दरीत कोसळला होता. दरम्यान, नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला या शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे.

माकडांसोबत सेल्फी काढणे जीवावर बेतले

मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात वाघजाई मंदिरासमोरील परिसरात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात हा सर्व प्रकार घडला. अब्दुल शेख नावाचे शिक्षक वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देत सेल्फी घेत होते. यावेळी अचानक अब्दुल यांचा तोल जाऊन ते 600 फूट खोल दरीत कोसळले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, वाघजाई मंदिराशेजारी उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या चारचाकी गाडीतून अब्दुल तिथे आले असल्याची माहिती काहींनी दिली.

नऊ तासांनंतर मृतदेह बाहेर

त्यानंतर अब्दुल शेख याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह महाड व भोर येथील रेस्क्यू टीम तसेच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रेस्क्यू टीमने 600 फूटांपर्यंत खाली उतरत अब्दुल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर मध्यरात्री 3 वाजता अब्दुल यांचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला. यानंतर नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अब्दुलचा मृतदेह वर आणण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

कामावर परताना सेल्फी घेणे ठरले जीवघेणे

अब्दुल कुदबुद्दीन शेख हे लातूर येथील रहिवाशी असून ते सध्या कुटुंबासह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात ते प्राथमिक शिक्षक म्हणून नोकर करत होते. तर त्यांची पत्नीही वेल्हा येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. मात्र मंगळवारी भोरहून वरंध घाटमार्गे शेख हे मंडणगडला जात होते. यावेळी रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. 

वरंधा घाट ठरतोय धोकादायक

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील वरंधा घाट हा कायमच धोकादायक ठरत आला आहे. पावसाळ्यात तर या घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळ्याच्या घटना घटत असतात. त्यामुळेच अनेकवेळा हा घाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येतो. तसेच अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांनासुद्धा अनेकदा बंदी घातली जाते. असे असतानाही पर्यटकांच्या दृष्टीने हा घाट कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र काही वेळा पर्यटकांकडून याठिकाणी अपघातालाही निमंत्रण देण्यात येत असयल्याचे समोर आले आहे.