निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. मात्र आता तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती प्रणवच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रणवचे कुटुंबीय फार चितेत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. कंपनीच्या जहाजावर प्रणव डेट कॅडेट म्हणून काम करायचा. गेल्या तीन दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केलाय. मात्र प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाच्या वडिलांचं नाव आहे.
पुण्यातील वारजे परिसरात राहणारा प्रणव कराड हा गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत नोकरीला आहे. याप्रकरणी गोपाळ कराड यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 22 वर्षीय प्रणव शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जेव्हा तो बेपत्ता झाला तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱ्या टँकर जहाजावर तैनात होता. शुक्रवारी फोन करुन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कंपनीने मेल करुन प्रणवच्या घरच्यांना याबाबत कळवलं.
"प्रणवने एमआयटी, पुणे येथून नॉटिकल सायन्सचा अभ्यास पूर्ण केला होता आणि तो विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता. तो रिझोल्व्ह II जहाजावर डेक कॅडेट म्हणून तैनात होता. गुरुवारी, आम्हाला जहाजवरील अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि नंतर शुक्रवारी एक ईमेल आला की सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रणव जहाजातून बेपत्ता झाला होता," अशी माहिती गोपाल कराड यांनी दिली.
"कंपनी आम्हाला सांगत आहे की शोध सुरू आहे पण तो कसा बेपत्ता झाला याबद्दल अधिक काही माहिती नाही. गुरुवारी आम्ही त्याच्याशी व्हॉट्सॲप कॉलवर बोललो. कंपनी त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतरांचे कोणतेही मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयापर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही पुणे आणि मुंबईतील पोलीस आणि इतर प्राधिकरणांशी संपर्क साधत आहोत," असेही गोपाल कराड म्हणाले.