परेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स

Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुडांची आयुक्तालयात बोलवून परेड काढल्यानंतर गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा या गुंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सागर आव्हाड | Updated: Feb 8, 2024, 10:48 AM IST
परेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना दोन दिवसांपूर्वी चांगलाच दणका दिला होता. आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह 300 गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली. अमितेश कुमार यांच्या या कारवाईची राज्यभरात चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यानंतर आता इशारा दिल्यानंतरही पुण्यातील गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यातील गुंड नीलेश घायवळचे विधानभवानातील रिल्स व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड काढली होती.. या गुन्हेगारांमध्ये गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके अशा गुन्हेगारांचा समावेश होता. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकिद यावेळी देण्यात आली होती.

मात्र आता पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंड जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही काही तासांमध्येच गुन्हेगारांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश मोडीत काढले आहेत. या गुंडाच्या समर्थकांनी सोशल मीडियावरील इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल करायचे नाहीत असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. मात्र पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दहशत पसरवणारे रिल्स व्हायरल होत आहे. गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स इन्स्टाग्रामवर अपलोड झाल्याचे समोर आले आहे. गुंड निलेश घायवळ याचे मंत्रालय परिसरातील रिल्स व्हिडीओ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आदेश दिल्यानंतरही रिल्स व्हायरल होत आहेत. 

पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याला त्याच्या गॅंगमधील गुन्हेगारांसह पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवले होते. पुन्हा असे फोटो व्हायरल करायचे नाहीत, तसेच ते रेकॉर्ड करायचे नाही असा दम दिला होता. असे रिल्स व्हायरल करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती पोलिसांना कळवायची आणि कोणी फेक अकाउंट तयार केले असतील तर त्याचीही माहिती पोलिसांना कळवायची असे सांगितले होते. मात्र पोलिसांनी सज्जड दम दिल्याच्या काही तासातच पुन्हा निलेश घायवळचे रिल्स व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे.