सांगली: विजेचा पुरेपूर वापर तरीही बिल मात्र शून्य रूपये...

महावितरणची कृपादृष्टी की, भोंगळ कारभार?

Updated: Jun 4, 2018, 12:46 PM IST
सांगली: विजेचा पुरेपूर वापर तरीही बिल मात्र शून्य रूपये... title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली:  राज्यात अनेक ठिकाणी वीज वापरलेली नसतानाही लाखो रुपयांची बिलं आलेली आपण पाहिली असतील. मात्र, महिनाभर नियमितपणे वीज वापरुन सुद्धा शून्य रुपये बिल आल्याचं उदाहरण तुमच्या पाहण्यात आहे का ? महावितरण विभागाच्या या अनोख्या कारभाराचे प्रत्यक्ष लाभार्थी ठरले आहेत ते सांगलीतले राहुल वरड. त्यावरचाच आमचा हा विशेष वृत्तांत. 

ग्राहक भरणार शून्य रूपयांचा चेक

सांगलीमधल्या राहुल वरड यांचा शहरापासून जवळच हरिपूर रोड भागात, पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना आहे. त्यात त्यांचं मिठाचं गोदाम आहे, इथे मीठ पॅकिंग करुन ते दुकानदारांना पुरवतात. गेल्या दोन महिन्यांपासून राहुल वरड यांना वीज वितरण विभागाकडून शून्य रुपयाचं बिल येतंय. एप्रिल महिन्यात ७० युनिट वीज वापरुनही त्यांना चक्क शून्य रुपयेच बिल आलं. म्हणून वरड यांनी महावितरणकडे तक्रार केली. त्यानंतर तांत्रिक बिघाडाचं कारण सांगत महावितरणनं वरड यांना १८०० रुपयांचं सुधारित बिल दिलं. विशेष म्हणजे ते वरड यांनी भरल्यानंतर, पुन्हा मे महिन्याचं बिल वरड यांना शून्य रुपयाचंच आलं. याबाबत चौकशी केली असता, मागील बिलामध्ये तुम्ही ऍडव्हान्स रक्कम भरली असल्यामुळे हे बिल शून्य रुपये आल्याचं, महावितरणनं सांगितलं. मजेशीर बाब म्हणजे हे शून्य रुपयाचं बिल वेळेमध्ये भरलं नाही, तर दहा रुपये दंड आकारण्यात येईल असंही नमूद करायला महावितरण विसरलं नाही. म्हणून शून्य रुपयाचा चेकच भरायचं वरड यांनी ठरवलंय. 

महावितरणची कृपादृष्टी की, भोंगळ कारभार

महावितरणनं अव्वाच्या सव्वा वीज बिलाच्या रकमेनं आतापर्यंत भल्याभल्यांना शॉक दिला आहे. मात्र राहुल वरड यांच्यावरची महावितरणची विशेष कृपादृष्टी म्हणजे, महावितरणच्या उफराट्या कारभाराचा अजब नमुनाच ठरला आहे.