मतदानाच्या दिवशीही मुसळधार पावसाचा अंदाज

मतदारांनो छत्र्या घेऊन बाहेर पडा पण मतदान करा. 

Updated: Oct 20, 2019, 12:27 PM IST
मतदानाच्या दिवशीही मुसळधार पावसाचा अंदाज title=

मुंबई : मतदानाच्या दिवशी म्हणजे उद्याही पाऊस कोसळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवारी विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबईत उद्या दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे. मतदारांनो छत्र्या घेऊन बाहेर पडा पण मतदान करा. 

राज्याच्या अनेक भागात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. काल दिवसभर पाऊस कोसळल्यावर आज पुन्हा पाऊस सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात सभा, रॅली आणि पदयात्रा काढणाऱ्या उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली. काल दुपारपासून पाऊस अधून मधून हजेरी लावत होता. 

विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील वीज गायब झाली आहे. सांगलीतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत होतं. विदर्भात नागपुरातही कालपासून पाऊस सुरू आहे.

शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात वरुणराजाने काल सकाळपासूनच हजेरी लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या भागात पडलेल्या पाऊसामुळे अनेक सभा, रोड शो रद्द झाले तर काही उमेदवारांना भरपावसात सभा घ्याव्या लागल्या.